मुंबई: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर गिफ्टचा वर्षाव सुरू झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र–गुजरातमध्ये रेल्वे मल्टी-ट्रॅकिंगचे दोन प्रकल्पाला हिंरवा कंदील दिला आहे असून हे दोन्ही प्रकल्पासाठी 2,781 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. द्वारका ते ओखा आणि बदलापूर–कर्जत मार्गाला या प्रकल्पामुळे गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे 4 जिल्ह्यांना रेल्वे कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे.
advertisement
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीकडून आज भारतीय रेल्वेसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून एकूण 2,781 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आणि गुजरातातील चार जिल्ह्यांमध्ये रेल्वे नेटवर्क 224 किमीने वाढणार आहे.
यामध्ये 141 किमीचा देवभूमी द्वारका (ओखा)–कानालुस डबलिंग प्रकल्प आणि 32 किमीचा बदलापूर–कर्जत तिसरी आणि चौथ्या लाईनचा समावेश आहे. या मार्गाच्या विस्तारामुळे रेल्वेची वाहन क्षमता वाढेल, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारेल तसंच वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची बचत होईल.
या दोन प्रकल्पांचा थेट लाभ 585 गावांतील सुमारे 32 लाख लोकसंख्येला होणार आहे. द्वारकाधीश मंदिरापर्यंतची जोड अधिक सुलभ झाल्याने पर्यटन आणि अर्थव्यवहाराला चालना मिळणार आहे. तर बदलापूर–कर्जत लाईन मुळे मुंबई उपनगरीय प्रवासी वाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
यामुळे मालवाहतुकीत 18 MTPA इतकी वाढ संभवत आहे. कोळसा, सिमेंट, कंटेनर, पेट्रोलियमसह विविध वस्तूंच्या वहनात रेल्वे अधिक सक्षम होणार आहे. यामुळे 3 कोटी लिटर इंधन बचत होईल आणि 16 कोटी किलो CO₂ उत्सर्जन कमी होऊन 64 लाख झाडे लावल्यासारखा पर्यावरणीय फायदा होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या नेटवर्क वाढीतला हा ऐतिहासिक टप्पा वेगवान, स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीकडे देशाचा मोठा पाऊल मानले जात आहे. यामुळे ठाणे आणि मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
