नेमका प्रकल्प असेल तरी कसा?
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकात हा एलिव्हेटेड प्रकल्प उभारण्यात येणार असून हा उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्प अखेर गतीने पुढे सरकू लागला आहे. अनेक वर्षांपासून जागेच्या आणि जमिनीच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम आता पुन्हा सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे 410 मीटर लांबीच्या रॅम्पसाठीचे बांधकाम सुरू झाले असून दोन्ही बाजूंवरील जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली आहे. या कामामुळे प्रकल्पाचा वेग वाढेल आणि संपूर्ण आराखडा लवकरच आकार घेईल.
advertisement
कुर्ला स्थानकावर अरुंद प्लॅटफॉर्म, जुन्या पुलांमुळे आणि गर्दीमुळे प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही परिस्थिती चिंताजनक होती. या सगळ्याचा विचार करून प्रवाशांच्या सोयीसाठी उन्नत रेल्वेमार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुर्ला स्थानकाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे.
या स्थानकावर उभारला जाणार
या प्रकल्पात एकूण 1,339 मीटर लांबीचा उन्नत रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. कुर्ला ते चुनाभट्टीदरम्यान एक नवीन उजत स्थानक उभारले जाणार असून डिसेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. गर्दीतून सुटका मिळेल, हालचाल अधिक सोपी आणि सुरक्षित बनेल. एकाच मार्गावरून विविध फलाटांवर सहज जाता येईल तसेच शटल गाड्यांची सेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळही कमी होईल.
कामाचा आढावा
चुनाभट्टीकडील बाजूचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. तिथे नवीन लोखंडी बीम बसवण्यात आले असून रॅम्पसाठी जागा मोकळी केली आहे. सीएसएमटीकडील बाजूसही काम सुरू आहे. आता दोन्ही दिशांनी बांधकाम एकाचवेळी सुरू होणार असल्याने प्रकल्पाचा वेग आणखी वाढेल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या प्रवाशांना होणार फायदा?
कुर्ला प्रकल्प केवळ पूल बांधणीपुरता मर्यादित नसून त्यात अनेक आधुनिक सुविधा समाविष्ट आहेत. उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानकानंतर सुरू होऊन टिळकनगरजवळील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडपर्यंत पोहोचेल. प्रकल्पात तीन फलाट असतील. यापैकी एका फलाटावर पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या पलटवण्यासाठी विशेष सुविधा असतील, ज्यामुळे कुर्ला-पनवेलदरम्यान शटल सेवा सुरू करणे शक्य होईल. तीन स्वतंत्र ट्रॅक असतील, एक सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी, दुसरा नवी मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी आणि तिसरा कुर्ल्यावरच संपणाऱ्या गाड्यांसाठी.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कुर्ला स्थानकावरील गर्दी कमी करणे हा आहे. सध्या प्रवासी अरुंद मार्गांवर अडकतात, पावसाळ्यात पाणी साचते आणि पुलांवरील ताण वाढतो. नवीन उन्नत मार्गामुळे ही सर्व समस्या दूर होतील. यात फूटओव्हर ब्रिज, स्कायवॉक, पादचारी पूल तसेच पाचवी आणि सहावी लाइनचे काम समाविष्ट आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कुर्ला स्थानक आधुनिक स्वरूपात दिसेल. प्रवाशांना कोणत्याही फलाटावरून सहज बाहेर पडता येईल. तसेच नवीन संरचनेत दुकाने आणि बसण्याची सोयही उपलब्ध असेल. एकूणच, प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असून मुंबईच्या रेल्वे नेटवर्कला यामुळे नवा वेग आणि आधुनिक रूप मिळणार आहे.
