मध्य रेल्वेने महाराष्ट्रातल्या तब्बल 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवर तिकिटासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि नागपूर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीचे नियंत्रण ताब्यात ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मध्य रेल्वेने 13 प्रमुख रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी पाहता प्रत्यक्षात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्दळीच्या स्थानकांवर व्यवस्थित ट्रेनमध्ये चढ- उतार करता यावा यासाठी हा नियम लागू केला आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म तिकिटांवर 5 डिसेंबर 2025 पासून 7 डिसेंबर 2025 पर्यंत बंदी लागू केली जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुलं आणि महिला प्रवाशांना मात्र नियमातून वगळण्यात आलं आहे. थोडक्यात ज्या प्रवाशांना इतरांच्या मदतीने रेल्वेत चढ- उतार करावी लागते अशा प्रवाशांसोबतच्या मंडळींना प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाईल. यामध्ये, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बंडेरा, मलकापूर, चाळीसगाव, नागपूर अशा एकूण 13 प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. जर तुम्ही सुद्धा या काळात प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.
