विशेष सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दरम्यान आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी, सीएसएमटी-सावंतवाडी रोड साप्ताहिक सेवा, सीएसएमटी-गोरखपूर दैनंदिन सेवा तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड आणि बनारस विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय समस्तीपूर आणि दानापूर मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पुणे-नागपूर, पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गांवरही विशेष गाड्या उपलब्ध असतील.
advertisement
कोकण रेल्वे मार्गावर होळीनिमित्त विशेष सोय करण्यात आली असून मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान एकूण 8 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येकी दोन फेऱ्या (दोन्ही बाजूंनी) धावतील, ज्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोड विशेष (01171/01172) ही गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मध्यरात्री 12:20 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12:30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती संध्याकाळी 5:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड (01119/01120) विशेष गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी रात्री 10:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीची गाडी 27 फेब्रुवारी आणि 6 मार्च रोजी संध्याकाळी 5:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.






