दहिसर- भाईंदर मेट्रोला इंडिपेंडेंट सेफ्टी असेसमेंट (ISA) सर्टिफिकेट प्राप्त झाले असून आता लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. सुरक्षा प्रमाणपत्रासाठी मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा पथकाला येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बोलावले जाणार आहे. त्यासाठी आयुक्तांकडून आणि रेल्वे सुरक्षा पथकाकडून मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे. मग त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. यानंतर दहिसर ते काशीगाव मार्गिका सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. दोन टप्प्यामध्ये मेट्रो 9 सुरू करणार असल्याचं बोलत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दहिसर- भाईंदर मार्गावरील मेट्रो सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे.
advertisement
दरम्यान, दहिसर- भाईंदर प्रवासासाठी लागणारा वेळ वाहतूकीचा पर्याय आणि रस्त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जो साधारणपणे 40 मिनिटे ते 1 तास किंवा त्याहून अधिक असू शकतो. प्रस्तावित 13.5 किमी लांबीचा मुंबई मेट्रो लाईन 9 प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासांचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. मेट्रोने नेमका किती वेळ लागेल, हे अद्याप समजू शकलेलं नाही. दहिसर- मिरा रोडमधील अंतर कमी करण्यासाठी मेट्रो सेवा सुरु केली जात आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मेट्रो 9 ही मार्गिका दहिसर ते अंधेरी मेट्रो 2 आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेचा विस्तार असणार आहे. यामुळे पश्चिम उपनगर थेट मीरा भाईंदरशी जोडली जाणार आहे. दहिसर- मीरा भाईंदर मेट्रो मार्गावर एकूण 10 मेट्रो स्थानकं असतील. या मेट्रोच्या कामासाठी 6600 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
