मनोज तिवारी यांच्या घरामध्ये, त्या चोरट्याने डुप्लिकेट चाव्यांचा वापर करून, तिजोरी उघडून त्यामध्ये असलेली लाखो रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. अंबोली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरेंद्र कुमार दीनानाथ शर्मा असं असून तो तिवारी यांच्याकडे सुमारे दोन वर्षे काम करत होता आणि त्या नंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद पांडे गेल्या 20 वर्षांपासून मनोज तिवारी यांच्याकडे मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मनोज तिवारी यांच्या घरातील बेडरूममधून एकूण 5,40,000 रूपयांची रोकड चोरीला गेली होती. धक्कादायक म्हणजे, जून 2025 मध्ये एका कपाटातून 4,40,000 रुपयेही गायब झाले होते, परंतु त्यावेळी चोराबद्दल कोणताही सुगावा लागला नाही.
advertisement
वारंवार घरातील लाखो रूपयांची रक्कम गायब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, डिसेंबर 2025 मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. परिणामी, 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता, सीसीटीव्ही अलर्टमध्ये माजी कर्मचारी सुरेंद्र कुमार शर्मा घरात चोरी करताना दिसला. फुटेजमध्ये आरोपीकडे घराच्या, बेडरूमच्या आणि कपाटांच्या डुप्लिकेट चाव्या असल्याचे स्पष्टपणे दिसून आले, ज्यामुळे तो अगदी सहज घरात येऊ शकला. पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, आरोपीने 15 जानेवारी रोजी अंदाजे एक लाख रुपये चोरले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली. त्या चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी त्याला औपचारिकरित्या अटक केली. सध्या, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत आणि संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
