लोकल उशीर किंवा रद्द झाल्यास स्टेशनवरच करा ऑफिसचं काम
पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वेतील पहिले अत्याधुनिक डिजिटल लाउंज आणि को-वर्किंग स्पेस सुरू केले आहे. सुमारे 1712 चौरस फूट क्षेत्रफळात उभारलेले हे लाउंज विमानतळावरील प्रीमियम सुविधांच्या धर्तीवर विकसित करण्यात आले असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि उपयोगी ठरणार आहे.
advertisement
बिझनेस ट्रॅव्हलर्स, फ्रीलान्सर्स तसेच ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा प्रवासादरम्यान शांत आणि सोयीस्कर जागेचा अभाव जाणवतो. हीच गरज लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा अभिनव उपक्रम राबवला आहे. लोकल उशीराने येणे किंवा रद्द होणे, लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणे अशा वेळी प्रवाशांना आता स्टेशनवरच बसून कार्यालयीन कामे पूर्ण करता येणार आहेत.
कोणत्या सुविधा मिळणार आहेत?
या डिजिटल लाउंजमध्ये हाय-स्पीड वाय-फाय, मोबाईल आणि लॅपटॉपसाठी अनेक चार्जिंग पॉइंट्स, तसेच खुर्च्या, टेबल आणि सोफ्यांसह आरामदायी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वैयक्तिक कामासाठी मॉड्यूलर वर्कस्टेशन्स उपलब्ध असून महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्ज किंवा व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी स्वतंत्र कॉन्फरन्स आणि मीटिंग रूम्स देखील देण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी सेल्फ-सर्व्हिस लाईट रिफ्रेशमेंट्स, नॉन-अल्कोहोलिक पेये आणि अपग्रेड केलेल्या टॉयलेट आणि वॉशरूम सुविधाही येथे उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे ही सुविधा केवळ रेल्वे प्रवाशांपुरती मर्यादित नसून घरून काम करताना अडचणी येणारे कर्मचारी किंवा अभ्यासासाठी शांत जागा शोधणारे विद्यार्थीही ठराविक शुल्क भरून या डिजिटल लाउंजचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावरील हा डिजिटल लाउंज शहरातील बदलत्या कामकाजाच्या संस्कृतीला नवा आयाम देणारा ठरणार आहे.
