या आदेशानुसार ई-चलान कारवाई करताना वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी खाजगी मोबाईलचा वापर करून गाड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत, जर असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. याआधीही अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते, पण काही ठिकाणी अजूनही त्यांचे पालन होत नसल्याचे आढळले आहे.
अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक संघटनांनी या विषयावर तक्रार केली होती. त्यांचा आरोप होता की काही पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलने अनेक वाहनांचे फोटो काढतात आणि नंतर ते ई-चलान प्रणालीत अपलोड करून चुकीची चलानं तयार करतात. या पद्धतीमुळे अनेक वाहनचालकांना अन्यायकारक दंड बसतो असे संघटनांचे म्हणणे आहे.
advertisement
या तक्रारीनंतर मंत्र्यांनी पोलिसांच्या या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अपर पोलीस महासंचालकांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की खाजगी मोबाईल वापरणे पूर्णपणे बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट निलंबनासह कठोर कारवाई होईल. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडसह सर्व विभागांना तो पाठवण्यात आला आहे.