मुंबई : मुंबईकरांसाठी समाधानकारक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 4 जुलै रोजी 8.59 टक्के एवढा पाणीसाठा होता. मुंबईसह राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे 14 जुलै रोजी पाणीसाठा 29.73 टक्क्यांवर येऊन पोहोचला. म्हणजे अवघ्या 10 दिवसांमध्ये मुंबईच्या पाणीसाठ्यात 21 टक्क्यांची वाढ झाली.
मागील वर्षी 14 जुलै रोजी एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता, तर 2022 साली या कालावधीत तब्बल 65 टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे सध्या पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी प्रशासनानं खबरदारी म्हणून पाणीकपातीचा निर्णय अद्याप कायम ठेवला आहे.
advertisement
हेही वाचा : Khadakwasla Dam : खडकवासला धरणाबाबत मोठी अपडेट, जलसंपदा विभागाने व्यक्त केला हा अंदाज
सध्या एकूण पाणीसाठा आहे 29.73% म्हणजेच 4,30,259 दशलक्ष लिटर. त्यापैकी अप्पर वैतरणामध्ये 4,319 (1.90%), मोडकसागरमध्ये 58,937 (45.71%), तानसामध्ये 88,276 (60.85%), मध्य वैतरणात 52,380 (27.07%), भातसामध्ये 2,05,765 (28.70%), विहारमध्ये 14,424 (52.08%) आणि तुळशीमध्ये 6,158 (76.54%) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी या मुख्य धरणांतून दरदिवशी 3,900 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर एवढी असून सध्या धरणांत केवळ 4 लाख 30 हजार 259 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तरी, धरणक्षेत्रात आतापर्यंत एकूण 7 हजार 894 मिमी एवढा पाऊस झाल्यानं पाणीसाठ्यात आधीपेक्षा वाढ दिसून आली. आता पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडल्यास पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होऊ शकते.