मुंबई : अलिबागमध्ये गरम पाण्यात बनवली जाणारी तांदळाची भाकरी ही अत्यंत प्रसिद्ध आहे. तसेच ही भाकर इतर कुठेच बनवली जात नाही. ही भाकरी गरम पाण्यात केल्यामुळे लुसलुशीत होते. फक्त आगरी, कोळी समाजातील स्त्रियांनाच ही हातावरची भाकरी जमते. कारण, ती शिकणे खूप कठीण आहे. ही भाकरी नक्की कशी केली जाते, याची रेसिपी तयार करण्यासाठी लोकल18 च्या टीमने मनीषा चव्हाण या गृहिणीशी संवाद साधला.
advertisement
रेसिपीसाठी लागणारे साहित्य - एक बाऊल भरून तांदळाचे पीठ, पिठाएवढेच पाणी, एक मोठी परात
कृती - सर्वप्रथम गॅसवर पाणी उकळवायला ठेवावे. पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून पीठ थोडसं जाडसर होईपर्यंत गॅसवर ठेवावे. पाच मिनिटानंतर पाणी आणि तांदळाचे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि परातीत काढून घ्यावे. पीठ परातीत काढल्यानंतर पीठ गरम असतानाच पीठ मळायला सुरुवात करावी. भाकरी आणखी लुसलुलुशीत व्हावी, यासाठी हे भाकरीचे पीठ मळताना पाण्याचा अधिक वापर करावा. हळूहळू पाणी घेत त्याला लावत पिठाचा गोळा मळून घ्यावे. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर छोटे छोटे गोळे करून हातावरच थोडा जोर देत गोल गोल भाकरी करायला सुरुवात करावी आणि गोल आकारात भाकरी थापायला सुरूवात करावी.
भाकरी पाण्यातली असल्यामुळे सुरुवातीला ती फाटू शकते. मात्र, भाकरीचे काठ व्यवस्थित कापून घेतले, कडा व्यवस्थित बोटांनी जोर देऊन थापल्या तर भाकरी व्यवस्थित होते. भाकरी पाण्यात थापून झाली की नंतर गरम तव्यावर भाकरी व्यवस्थित शिजवून शेकून घ्यावी. अशाप्रकारे तुमची भाकरी तयार होईल. मग त्यानंतर तुम्ही ही भाकरी चिकन किंवा तुम्हाला आवडणाऱ्या भाजीसोबत खाऊ शकता.
'ही पाण्यावरची भाकरी म्हणजे आमची परंपराच आहे. प्रत्येकाला अशी भाकरी जमेलच असे नाही. पण जर इच्छा असेल आणि अंदाज बरोबर असेल तर ही भाकरी कोणालाही जमू शकते,' असे मनीषा चव्हाण या गृहिणीने सांगितले. तुम्हालाही जर अशी मऊ लुसलुशीत भाकरी खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्हीही याप्रकारे ही भाकरी तयार करुन खाऊ शकता.