वर्षानुवर्षे रखडलेला उड्डाणपूल अखेर मार्गी
विद्याविहार पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या या रेल्वेवरील उड्डाणपुलाच्या कामाची नुकतीच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. त्यानंतर महापालिकेने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. महापालिकेनुसार या उड्डाणपुलाचं संपूर्ण काम 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.
पुलाच्या पूर्वेकडील बाजूचं काम 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामध्ये जोड रस्त्यांची कामे, पुलावरचा रस्ता तयार करणे तसेच इतर गरजेची कामे समाविष्ट आहेत. मान्सून लक्षात घेता 31 मे 2026 पर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पुलाची एक बाजू येत्या महिन्यात वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे.
advertisement
हा पूल कुठून-कुठे जोडला जाणार?
हा उड्डाणपूल घाटकोपर पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना थेट जोडणार आहे. रेल्वे रूळांवरून जाणाऱ्या या पुलाची एकूण लांबी सुमारे 650 मीटर असून त्यावर दोन मार्गिका असणार आहेत.
पश्चिमेकडील बाजूला आतापर्यंत सहा खांबांचे काम पूर्ण झाले असून राहिलेले चार खांब, स्पॅन आणि पोहोच रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे करताना वाहतूक वळविणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे वाहतुकीवर कमी परिणाम होईल यासाठी आधी दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
या उड्डाणपुलाची पहिली मागणी 1991 मध्ये करण्यात आली होती. तब्बल 30 वर्षांनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येत असून घाटकोपर, विक्रोळी आणि विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
