मंडाळे ते डी.एन.नगर मेट्रो रेल्वेची मार्गिका 'मेट्रो 2 बी' आहे. 'मेट्रो 2 बी'ची मार्गिका वांद्रे रेल्वे स्थानकाला जोडली जाणार आहे. यासाठी एमएमआरडीएला 41 कोटी 44 लाख रुपये खर्चून पादचारी पूल उभारावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यासाठी 278 मीटर लांबीचा हा पूल उभारावा लागणार आहे. त्यामुळे 'मेट्रो 2 बी' मार्गिकेच्या वांद्रे मेट्रो स्टेशनमधून विना अडथळा थेट वांद्रे रेल्वे स्थानकात पोहचणे शक्य होणार आहे. 'मेट्रो 2 बी' मार्गिकेचा पहिला टप्पा येत्या महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर उरलेल्या मार्गाचेही काम एमएमआरडीएला येत्या दीड ते दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्लॅन आहे.
advertisement
त्यामुळे मेट्रोचा संपूर्ण मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असताना मेट्रो स्थानकातून उतरून पश्चिम रेल्वेवर पोहोचणे प्रवाशांना सोपे व्हावे, यासाठी विविध उपाययोजना करण्यास 'एमएमआरडीए'ने सुरुवात केली आहे. वांद्रे येथील एस. व्ही. रस्त्यावर वाहनांची कायमच वर्दळ असते. बांद्रा रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा, दुचाकी, मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची गर्दी शिवाय प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर असते. त्यातूनच सर्वांना वाट काढावी लागते. 'मेट्रो 2 बी' मार्गिका सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा पादचारी पूल प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
पादचारी पुलाच्या कामासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया 'एमएमआरडीए'ने सुरू केली आहे. कंत्राटदाराला हे काम 18 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. पादचारी पुलाच्या कामासाठी एमएमआरडीएने 41 कोटी 44 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. पादचारी पुलावर ये-जा करण्यासाठी एमएमआरडीएकडून दोन सरकते जिने बसवले जाणार आहे. शिवाय, त्या पादचारी पुलाच्या एका बाजूला प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग दिला जाणार आहे. 'एमएमआरडीए'ने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीही उपाय योजना केल्या आहेत. त्यानुसार या पादचारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी 13 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कंत्राटदाराला या पादचारी पुलासाठी सेवा वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार आहेत.
