महाराष्ट्रात भाजपने 45 प्लसचा नारा दिला होता, पण भाजपच्या या नाऱ्याला धक्का बसला आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी एनडीएला 32 ते 35 जागा तर महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपला 20 ते 23 जागा मिळतील तर काँग्रेसला 6-9 जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 1 जागा मिळाली होती, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढू शकते.
advertisement
महाराष्ट्रामध्ये महायुतीकडून भाजपने 28 तर शिवसेनेने 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा लढवल्या होत्या. तर महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा लढवल्या. काँग्रेसने 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या.
महाराष्ट्रातील एक्झिट पोल 2019 ची स्थिती
2019 च्या लोकसभा एक्झिट पोलने महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीसाठी चांगल्या कामगिरीचा अंदाज वर्तवला होता. एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीला 36-38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात एनडीएने 41 जागा मिळवल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 11 जागा मिळतील असा अंदाज होता, मात्र केवळ 6 जागा मिळाल्या.
वाचा - सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसला पहिला मोठा धक्का! एक्झिट पोल कुणाला किती जागा?
2019 च्या तुलनेत 2024 मध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, 2019 च्या तुलनेत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदारांची संख्या सुमारे 30 लाखांनी वाढली आहे. 2019 च्या निवडणुकीत, 54,054,245 व्यक्तींनी मतदान केले, तर 2024 मध्ये ही संख्या 57,006,778 पर्यंत वाढली, जी 2,952,533 मतदारांची वाढ दाखवते. 2019 मध्ये 60.95% वरून 2024 मध्ये 61.33% पर्यंत वाढून, मतदानाच्या टक्केवारीतही किंचित वाढ झाली.