मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपासंदर्भात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून अंतिम शिक्कामोर्तब मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईतील 36 जागांचा तिढाही सुटला आहे. मुंबई शहरात ३६ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक जागा भाजपला मिळणार आहेत.
राज्यातील जागावाटपावर दिल्लीत बैठक झाल्यानंतर आता त्याचा अंतिम निर्णय मुंबईतच घेतला जाणार आहे. तर मुंबईतील 36 जागांमध्ये सर्वाधिक भाजपला आणि त्यानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादीला तीन जागा दिल्या जाणार आहेत. भाजपला 18, शिवसेनेला 15 तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यात राष्ट्रवादीच्या वाट्याला अनुशक्ती नगर, वांद्रे पूर्व, शिवाजीनगर- मानखुर्द या जागांचा समावेश आहे.
advertisement
दरम्यान, महायुतीची पहिली यादी आज येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण दिल्लीतील बैठकीत अंतिम तोडगा निघाला नसल्यानं महायुतीची मुंबईतपुन्हा बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला जाणार असून देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. याशिवाय अजित पवार नाशिक दौऱ्यावर असल्यानं अंतिम बैठक आज रात्री किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.
शाहांच्या निवासस्थानी चार तास बैठक, फॉर्म्युला ठरला?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या जागावाटपसंदर्भात पहाटे 2.30 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. रात्री उशिरा तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला आणि कोणत्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे ठरल्याची माहिती मिळतेय. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार भाजप सुमारे 151 जागांवर, शिवसेना 84 जागांवर आणि राष्ट्रवादी 53 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या जागावाटपाबाबत तिन्ही पक्ष लवकरच संयुक्त पत्रकार परिषद घेत घोषणा करण्याची शक्यता आहे.
