शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:
कार्यालये बंद: राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज पूर्णपणे बंद राहतील.
शिक्षण संस्थांना सुट्टी: सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ध्वज अर्ध्यावर: राज्यातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज आज अर्ध्यावर उतरवलेले राहतील.
कार्यक्रम रद्द: शासनाकडून आयोजित केलेले आजचे सर्व करमणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत.
advertisement
'शासकीय दुखवटा' म्हणजे काय? या काळात काय नियम असतात?
जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या नेत्याचे किंवा पदाधिकाऱ्याचे निधन होते, तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ सरकार 'राजकीय किंवा शासकीय दुखवटा' जाहीर करते. या काळात प्रोटोकॉलनुसार खालील गोष्टी पाळल्या जातात:
१. राष्ट्रध्वज अर्ध्यावर : ज्या इमारतींवर दररोज राष्ट्रध्वज फडकवला जातो (उदा. मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन), तिथे ध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. हे राष्ट्रीय शोकाचे प्रतीक मानले जाते.
२. अधिकृत मनोरंजन कार्यक्रमांवर बंदी: या काळात सरकारतर्फे कोणताही उत्सव, सोहळा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जात नाही. जर असा कार्यक्रम आधीच ठरलेला असेल, तर तो रद्द केला जातो किंवा पुढे ढकलला जातो.
३. विदेशी पाहुण्यांचे स्वागत नाही: दुखवट्याच्या काळात सहसा कोणत्याही विदेशी मान्यवरांचे अधिकृत स्वागत किंवा मेजवानीचे कार्यक्रम टाळले जातात.
४. शासकीय अंत्यसंस्कार: संबंधित नेत्यावर 'राजकीय इतमामात' अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये पोलिसांच्या तुकडीतर्फे सलामी दिली जाते.
५. पुष्पहार अर्पण: महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये नेत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते.
