चिमटा अखेर जप्त केला
आलोक सिंह हत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोहमार्ग पोलिसांनी या गुन्ह्यात वापरण्यात आलेला चिमटा (Tongs) अखेर जप्त केला आहे. आरोपी ओंकार शिंदे याने पळ काढताना हा चिमटा एका आरओबीवरून (ROB) फेकून दिला होता, ज्याचा शोध पोलीस गेल्या काही दिवसांपासून घेत होते.
advertisement
शोधमोहीम राबवून हत्यार हस्तगत
स्थानिक पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानक परिसरातील शोधमोहीम राबवून हे हत्यार हस्तगत केले आहे. 24 तारखेला लोकलमधून उतरताना झालेल्या एका किरकोळ वादातून या भीषण हत्येची घटना घडली होती. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले आणि त्यात आरोपीने आलोक सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
चिमटा खुपसवून पळून जाण्याचा प्रयत्न
मालाड स्थानक येण्यापूर्वी झालेल्या वादानंतर ओंकार शिंदेला त्याच्या बॅगेत इमिटेशन ज्वेलरीचे काम करण्यासाठी वापरला जाणारा चिमटा असल्याचे लक्षात आले. त्याने बॅगेतील चिमटा बाहेर काढला आणि आलोककुमार सिंह यांना चिमटा खुपसवून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला.
रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू
दरम्यान, या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी ओंकार शिंदे याने हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार चिमट्याचा वापर केला होता. हा चिमटा त्याने आलोक सिंह यांच्या पोटात जोरात भोसकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान या तरुण शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
