संदीप जळगावकर हे मनसेची स्थापना झाल्यापासून पक्षात आहेत. २०१९ ची विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. त्यांना ४२ हजार मते मिळाली होती. मुंबईत मनसेने जितके उमेदवार उभा केले होते त्यात जळगावकर यांना सर्वाधिक मते मिळाली होती. यावेळीही ते विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण जळगावकर यांच्या ऐवजी शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज झाले.
advertisement
संदीप जळगावकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केलीय. ते म्हणाले की,आदरणीय राजसाहेब आणि शर्मिला वहिनी, आज तुमच्या मुळे आम्हाला ओळख मिळाली पक्षासाठी काम करताना व अनेक केसेस घेताना अभिमान वाटायचा. कधीही पक्षाच्या नावावर कोणाकडून एकही रूपया घेतला नाही. स्वतःच्या मेहनतीचे करोडो रुपये आजपर्यंत पक्ष वाढवण्यासाठी खर्च करत आलो. कुठल्याही प्रकारची पर्वा न करता अनेक केसेस गेल्या १८ वर्षात अंगावर घेतल्या इतकी वर्ष कोणत्याही पदाची किंवा उमेदवारीची अपेक्षा न बाळगता पक्षासाठी निस्वार्थी काम केलं.
शरद पवारांचा मला दुरुन आशीर्वाद, झिरवाळांच्या मनात चाललंय तरी काय?
२०१९ ला अनेक पदाधिकाऱ्यांना मागे लागलो परंतु भांडूप मधून विधानसभा लढवायला तयार नव्हते त्या वेळी मी भांडूप मधून विधानसभा लढवली आणि ताकदीने लढवली आणि भांडूप च्या जनतेने भरभरून प्रेम दिलं. आत्ता २०२४ विधानसभा निवडणूकीच्या २ महिने आधी मी स्वतः शिरिष सावंत साहेबांना बोललो कि तुम्ही भांडूप मधून निवडणूकिला उभे राहा. तेव्हा ते मला बोले कि मला नाही लढायचे आहे.
आज त्यांची उमेदवारी कोणत्याही भांडूप विधानसभेच्या पदाधिकार्यांना न विचारतां जाहीर झाली. त्या बद्दल त्यांचे मी अभिनंदन हि केले. एकाच गोष्टीचं वाईट वाटलं कि शिरीष सावंत यांनी भांडूपच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर आम्ही सर्वानी मोठ्या ताकदीने काम केलं असते. शिरीष सावंत यांच्या अश्या वागण्यामुळे त्यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर असलेला अविश्वास दिसून येतो. तरी याच कारणांमुळे मी माझ्या मनसे विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं संदीप जळगावकर यांनी म्हटलंय.
