अमरावती : लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेला मात्र युती आघाडी न करता 'एकला चलो रे' ची भूमिका घेऊन प्रस्थापित राजकीय पक्षांविरोधात दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला विदर्भात बळकटी देण्यासाठी गेल्या काही महिन्यांतला दुसरा विदर्भ दौरा राज ठाकरे यांनी केला. याच दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील उमेदवार राज ठाकरे यांनी निश्चित केला आहे.
advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसीय विदर्भ दौरा केला. शुक्रवार (27) आणि शनिवारी (28) राज ठाकरे अमरावतीमध्ये होते. या दोन दिवसांत 11 जिल्ह्यांचा आढावा राज यांनी घेतला. त्यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष, तालुकाप्रमुख तसेच संघटनेतील पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार ठरला
याच बैठकीत विदर्भातील नागपूर येथील मनसेच्या पहिल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्य भाजपचे शीर्षर्थ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन हात करण्यासाठी मनसे नेते तुषार गिरे यांच्या नावावर पक्षातील नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांतच तुषार गिरे यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील उमेदवार ठरवून राज ठाकरे हे अमरावतीमधून मुंबईकडे निघाले आहेत. पुढील काही दिवसात विभागनिहाय आढावा घेऊन राज ठाकरे उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करून उमेदवारी यादी जाहीर करतील.
भाजपला फटका बसण्याचा अंदाज
नागपूर विभागाचा व नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा आढावा शनिवारी राज ठाकरे यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेत मात्र वेगळे लढत असल्याने भाजपला काही जागांवर फटका बसणार आहे. हिंदुत्ववादी मतांची विभागणी होणार असल्याने शिवसेना आणि भाजपलाही काही प्रमाणात फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
