पैशांवरून महिलांमध्ये 'हाय व्होल्टेज' ड्रामा
तक्रारदार महिला आणि संशयित आरोपी महिला या दोघीही कोपरखैरणे परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोघींमध्ये ओळख असल्याने तीन वर्षांपूर्वी फिर्यादी महिलेने आरोपी महिलेला 15 हजार रुपये उसने दिले होते. यापैकी आरोपी महिलेने 9 हजार रुपये परत केले होते. मात्र राहिलेले सहा हजार रुपये बरेच दिवस उलटूनही परत केले जात नव्हते.
advertisement
तक्रारदार महिलेने अनेक वेळा पैसे मागूनही आरोपी महिला टाळाटाळ करत होती. अखेर मंगळवारी हा व्यवहार मिटवण्यासाठी तक्रारदार महिला तिच्या सासूसोबत आरोपी महिलेकडे गेली. यावेळी पैशांवरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
या झटापटीत आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या तक्रारदार महिलेच्या सासूला शिवीगाळ करण्यात आली. या गोंधळात फिर्यादी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचे तिच्या लक्षात आले.
घटनेनंतर फिर्यादी महिलेने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
