यूटीएस ॲपवरील (UTS App) ऑनलाइन तिकीट आणि पास ग्राह्य धरावेत आणि ऑफलाइन काढलेल्या पाससोबत ओळखपत्राची तपासणी सक्तीने करावी, असे निर्देश महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात कठोर सूचना दिल्या आहेत. गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी बनावट तिकिटे आणि पासच्या मुद्द्याचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत एआय आणि एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून बनावट एसी लोकल ट्रेनचे बनावट पास तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बनावट तिकिट काढून प्रवास करण्याचा प्रकार मध्य रेल्वेवर 3 आणि पश्चिम रेल्वेवर 2 अशा प्रकरणांमध्ये विविध रेल्वे पोलिस ठाण्यामध्ये (GRP) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
प्रवाशांमध्ये बनावट तिकिट काढून प्रवास करण्याचे प्रमाण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व टीसींना मासिक पास किंवा तिकिटासोबत प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे अनिवार्य असून वैध तिकिट असतानाही, प्रवासादरम्यान प्रवाशांनी ओळखपत्र दाखवले नाही तर दंड आकारला जाईल. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेच्या नियमानुसार, विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 500 रूपये दंड भरावा लागतो. परंतु, खोटं तिकिट काढून प्रवास करणे एकप्रकारे गुन्हा आहे, ही रेल्वेची एक प्रकारे फसवणूकच आहे. अशा गुन्ह्यांसाठी प्रवाशाला भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार कमाल 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दाखल गुन्ह्यांची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापक गुप्ता यांनी दिले आहेत.
