जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचा बेलासिस रोड) हा पूल मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना रेल्वेमार्गावरून पूर्व–पश्चिम जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. हा पूल सुरू झाल्यास जहांगीर बोमन बेहराम मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग (ग्रॅण्ट रोड), पठ्ठे बापूराव मार्ग तसेच महालक्ष्मी स्थानकाजवळील पुलावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
MHADA Home : प्रथम येणाऱ्यास प्राधान्य! लॉटरी शिवाय घर घेण्याची संधी; कधी अन् कुठे अर्ज करायचा?
advertisement
महापालिकेने युद्धपातळीवर काम करत पुलावरील डांबरीकरण, संरक्षक रेलिंग तसेच विद्युत रोषणाईची सर्व कामे पूर्ण केली आहेत. पूल बांधकाम पूर्ण होऊनही वरिष्ठ नेत्यांची वेळ न मिळाल्याने उद्घाटन रखडल्याची टीका होत आहे.
दरम्यान, बेलासिस पूल बंद असल्यामुळे मुंबई सेंट्रल, ताडदेव आणि भायखळा परिसरातील वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. वाहनांना लांबचा वळसा घ्यावा लागत असल्याने प्रवासाचा वेळ 30 ते 40 मिनिटांनी वाढत आहे. नायर आणि जे. जे. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.
कसा आहे नवा पूल?
पुलाची एकूण लांबी 333 मीटर असून पूर्व बाजूची लांबी 138.39 मीटर, पश्चिम बाजूची लांबी 157.39 मीटर आणि रेल्वे हद्दीतील लांबी 36.90 मीटर आहे. वाहतूक मार्गाची रुंदी 7 मीटर असून दोन्ही बाजूंना पुरेशा रुंदीचे पदपथ देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुलाला संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र तसेच सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र रेल्वेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






