ब्रिटिशकालीन सुमारे 130 वर्षे जुना बेलासिस पूल धोकादायक ठरल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नव्या उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीसाठी सप्टेंबर 2024 मध्ये कार्यादेश देण्यात आला. प्रत्यक्ष बांधकामास 1 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात झाली. अत्यंत कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या पूल विभागाने आणि रेल्वे विभागाच्या अभियंत्यांनी समन्वयाने विशेष प्रयत्न केले.
advertisement
बांधकामादरम्यान अनेक अडचणींवर मात करावी लागली. वीजवाहिन्यांचे स्थलांतरण, पुलाच्या मार्गातील 13 बांधकामे हटविणे व संबंधित रहिवाशांना पर्यायी निवास देणे, एका सोसायटीची सीमाभिंत हटविणे, पावसाळ्यातही काम सुरू ठेवणे तसेच न्यायालयीन खटल्यांचा सामना करणे अशी विविध आव्हाने होती. मात्र नियोजनबद्ध कामकाजामुळे पूल वेळेत पूर्ण करण्यात यश आले.
नवीन बेलासिस उड्डाणपुलाची एकूण लांबी 333 मीटर असून पूर्वेकडील भाग 138.39 मीटर आणि पश्चिमेकडील भाग 157.39 मीटर लांबीचा आहे. पुलावरील वाहतूक मार्गाची रुंदी 7 मीटर असून दोन्ही बाजूंना पुरेशा रुंदीचे पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
हा पूल जहांगीर बोमन बेहराम मार्गावर असून तो मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव भागांना रेल्वे मार्गावरून पूर्व–पश्चिम जोडतो. पूल सुरू झाल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग, पठे बापूराव मार्ग तसेच महालक्ष्मी स्थानक पुलावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
पुलाची अंतिम कामे 6 जानेवारी रोजी पूर्ण झाली असून भार चाचणी, संरचनात्मक स्थिरता व सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. रेल्वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळताच वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.






