वांद्रे-कुर्ला स्टेशन परिसरात प्रवाशांना सहज आणि विनाअडथळा प्रवास करता यावा म्हणून पॉड टॅक्सी प्रकल्प राबविला जात आहे. हा प्रकल्प वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्टेशनला जोडेल त्यामुळे येथे ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन उभारणे आवश्यक आहे. स्टेशन परिसरात जागा नसल्यामुळे एआरटीएस स्टेशन कुर्ला स्टेशनपासून सुमारे 200 मीटर अंतरावर उभारले जाणार आहे, जे स्कायवॉकद्वारे स्टेशनशी जोडले जाईल. स्कायवॉकच्या लँडिंगसाठी मध्य रेल्वेची ही जमीन वापरली जाऊ शकते असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने सुमारे 4,000 चौ. मीटर जमीन एमएमआरडीएला देण्यास मंजुरी दिली आहे. पॉड टॅक्सी स्टेशन वांद्रे रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉकशी जोडण्याचा प्रस्ताव आहे.
वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबईतील काही लोकल स्टेशन स्कायवॉकद्वारे मेट्रो स्टेशनशी जोडले गेले आहेत, त्याचप्रमाणे कुर्ला आणि वांद्रे लोकल स्टेशन पॉड टॅक्सी स्टेशनशी जोडले जाऊ शकतात. सध्या कुर्ला स्टेशनपासून बीकेसीपर्यंत जाणे प्रवाशांसाठी कठीण आहे. पॉड टॅक्सीमुळे वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी मांडणीवर राबविला जाणार आहे.
असे असेल भाडे?
वांद्रे उपनगरीय स्टेशनजवळही एआरटीएस स्टेशन उभारणे शक्य नसल्यामुळे जवळच रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. पॉड टॅक्सी सेवा सुरु झाल्यानंतर बीकेसी ते कुर्ला प्रवासासाठी अंदाजे 21 रुपये प्रति किमी भाडे असेल. प्रकल्पाची लांबी 8.8 किमी असून, अंदाजे खर्च 1,016.34 कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा मिळेल आणि मुंबईतील कोंडी थोडी कमी होईल.