मुंबईत पहिलं जेन-झी पोस्ट ऑफिस
जेन-झी पोस्ट ऑफिस हे खास करुन विद्यार्थी, तरुण आणि डिजिटल युगातील नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे. येथे पारंपरिक टपाल सेवांसोबतच आधुनिक आणि डिजिटल सुविधांचा अनुभव मिळणार आहे. याआधी दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारची जेन-झी पोस्ट ऑफिस सुरू झाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचनंतर आता मुंबईत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
advertisement
या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह आणि मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक केया अरोरा यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आयआयटी मुंबईचे कुलसचिव, टपाल विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि आयआयटी मुंबईतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काय मिळणार सुविधा...?
या जेन-झी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक खास सुविधा देण्यात येणार आहेत. येथे मोफत वायफाय, कॅफेटेरिया-शैलीतील बैठक व्यवस्था तसेच एक छोटे वाचनालय असणार आहे. तरुणांसाठी स्वतंत्र संगीत रुमही असेल. निवडक टपाल तिकीट संग्रह आणि त्यासंबंधित वस्तू येथे पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. नागरिकांमध्ये टपाल सेवांबद्दल माहिती देण्यासाठी पार्सल ज्ञान पोस्ट ही संकल्पना राबवली जाणार आहे.
सर्व सेवा पूर्णपणे डिजिटल आणि क्यूआर कोडवर आधारित असतील. येथे आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा तसेच टपाल कार्यालय बचत बँक योजनांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पीड पोस्ट सेवांवर 10 टक्के सवलत तर मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के सवलत दिली जाणार आहे. हा उपक्रम तरुणांसाठी टपाल सेवेचा अनुभव अधिक सोपा, आधुनिक आणि आकर्षक बनवणार आहे
