17 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गिरगावातील सेन्टेक कोटेड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आवारात एका 39 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. व्हीपी रोड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मध्यरात्री 01:00 ते 01:30 च्या दरम्यान कंपनीच्या पहिल्या मजल्यावर घडली. इमारत क्रमांक 13, खेतवाडी 7 वी लेन, गिरगाव, मुंबई येथे घडली. मृताचे नाव रमेश हाजाजी चौधरी (39), जो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. रमेश चौधरीची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.
advertisement
पोलिसांनी अटक केलेल्याचं नाव सूरज संजय मंडल (22) असं आहे. आरोपी आणि ज्या व्यक्तीची हत्या केलेली आहे, ते दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला होते, शिवाय राहायला सुद्धा एकाच परिसरात होते. 16 आणि 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री काही कारणांमुळे सूरजने लाकडी स्टुल आणि अग्निशामक यंत्राचा वापर करून रमेशवर हल्ला केला, ज्यामुळे रमेशचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी सूरजने थेट बिहारची वाट धरली होती. पोलिसांना हत्येची माहिती मिळताच त्यांनी आरोपीचाही शोध घेतला. मुंबई पोलिसांनी थेट बिहारमधूनच आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, व्हीपी रोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिस पुढील तपास करीत आहे.
