प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत मेट्रोमधील एसी बंद असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. बिघाडामुळे गाड्यांमध्ये हवा खेळती न राहिल्याने उकाड्याने प्रवासी हैराण झाले. काही ठिकाणी मेट्रो थांबून राहिल्या आहेत. मेट्रो स्थानकात परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महिलांच्या आणि पुरुषांच्या अशा वेगवेगळ्या र रांगा लागल्या आहेत. घरी जाण्याची वेळ असल्याने मोठी गर्दी झाली आहे. घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो धिम्या गतीने धावत आहेत.
advertisement
मेट्रोच्या कारभारावर तीव्र नाराजी
मुंबई मेट्रो प्रशासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून या बिघाडाची माहिती दिली आहे. "तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो सेवा उशिराने सुरू आहेत, लवकरच सेवा सुरळीत करण्यात येईल," असे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाच्या प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका पश्चिम उपनगरातील प्रवासासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, कांदिवली, दहिसर या भागातील दैनंदिन प्रवासावर मेट्रोचा मोठा आधार आहे.
मेट्रो व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही महिन्यांत मेट्रोच्या तांत्रिक बिघाडांच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी तसेच सुरळीत सेवेकरता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळीच झालेल्या या बिघाडामुळे पुन्हा एकदा मेट्रो व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.