सध्या या दोन्ही मार्गिकांचे संचालन चारकोप डेपोतून केले जाते. मात्र नव्या नियोजनानुसार पुढे चारकोप डेपोतून केवळ मेट्रो ७ मार्गिकेचे संचालन होईल तर मेट्रो २अ मार्गिकेचे संचालन मंडाळे डेपोतून केले जाईल. दरम्यान मेट्रो २ब मार्गिका म्हणजे डायमंड गार्डन ते मंडाळे हा टप्पा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात मेट्रो २अ आणि २ब या दोन्ही मार्गिका एकत्रित चालवल्या जातील. त्यामुळे संपूर्ण मेट्रो २ मार्गिकेचे संचालन मंडाळे डेपोतूनच होणार आहे. दहिसर पूर्व ते काशिगाव (मिरा रोड) हा मेट्रो ९ मार्गिकेचा टप्पाही लवकरच कार्यान्वित होणार आहे. या मार्गिकेचे मेट्रो ७ सोबत एकत्रीकरण केल्यानंतर गुंदवलीवरून मेट्रो पकडल्यास थेट मिरा रोडपर्यंत प्रवास करता येईल.
advertisement
त्यामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि अखंड होईल. याशिवाय मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. मेट्रो ७अ, ७ आणि ९ या तिन्ही मार्गिका एकत्र करून प्रवाशांना विमानतळ, मिरा रोड, दहिसर, अंधेरी, गुंदवली आदी प्रमुख ठिकाणांदरम्यान अखंड जोडणी मिळेल. दुसरीकडे मेट्रो २अ आणि २ब मार्गिका एकत्र आल्यानंतर चेंबूर, कुर्ला, वांद्रे कुर्ला संकुल (BKC) आणि मंडाळेपर्यंत थेट प्रवास शक्य होईल. या बदलांमुळे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क मोठ्या प्रमाणात सुधारेल. मेट्रो मार्गिकांचे हे विस्तार आणि स्वतंत्र संचालन यामुळे प्रवाशांना वेळेची बचत गर्दीतील दिलासा आणि सोयीस्कर प्रवासाचा नवा अनुभव मिळेल.
