मुंबई महानगरपालिकेचा महापौर नेमका कोण होणार, याचा निर्णय जानेवारी महिना अखेरीस स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस महापौर निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन 24 तास झाले नाही, महापौरपदाविषयी मोठी अपडेट आली आहे. सत्तास्थापन, संख्याबळाची गणिते आणि संभाव्य आघाड्यांमुळे महापौर निवड प्रक्रियेवर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. राजकीय वर्तुळात विविध नावांची चर्चा सुरू असली, तरी अधिकृत घोषणा होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
advertisement
जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौरपदासाठी सोडत काढण्याची प्रक्रिया राबवणार आहे. महापालिकेतील आरक्षणाच्या नियमानुसार महापौरपदासाठी सोडत काढली जाते. या सोडतीनंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार, हे स्पष्ट होणार असून त्यानंतरच उमेदवारांची नावे निश्चित होण्यास सुरुवात होईल.
सोडतीनंतर 10 दिवसात महापौर निवडीची शक्यता
महत्त्वाचे म्हणजे, सोडत काढल्यानंतर साधारण दहा दिवसांच्या आत महापौर निवड होण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. या कालावधीत संबंधित पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जातील. तसेच पक्षांतर्गत बैठका, रणनीती आखणे आणि संभाव्य पाठिंबा मिळवण्यासाठी हालचालींना वेग येईल. महापौरपद हे मुंबई महानगरपालिकेतील सर्वोच्च पद मानले जाते. त्यामुळे या पदासाठी राजकीय पक्षांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबईच्या कारभाराची दिशा, विकासकामे आणि प्रशासकीय निर्णयांवर महापौराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
फेब्रुवारीत मिळणार नवा महापौर
दरम्यान, महापौर कोण होणार, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. जानेवारी अखेरीस सोडत आणि त्यानंतर महापौर निवड झाल्यानंतर अखेर मुंबईला नवा महापौर मिळणार असून, नव्या नेतृत्वाकडून शहराच्या प्रश्नांवर काय भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
