मुंबई : कस्तुरबा रुग्णालयातील निवृत्त कक्ष अधिकाऱ्यांच्या निरोप सोहळ्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘देव आणि देवळांचा धर्म’ हे पुस्तक सहकाऱ्यांना भेट म्हणून दिल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि तणाव निर्माण झाला. या प्रकरणात आता आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
राजेंद्र कदम (58) हे कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. 30 ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्याआधी 28 ऑगस्टला सहकाऱ्यांसाठी त्यांनी निरोप समारंभ आयोजित करून प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘देव आणि देवळांचा धर्म’ आणि दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुश्मन’ ही दोन पुस्तके वाटली.
मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 ऑगस्टला रुग्णालयातील सहाय्यक अधिसेविकेने कदम यांना कक्षात बोलावले. तेथे काही महिला परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कदम यांना प्रश्न विचारला.
वाद चांगलाच चिघळल्याने कदम यांनी तातडीने हात जोडून माफी मागितली. पण, तरीही काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंगावरच पुस्तक फेकले. कदम यांनी या प्रकरणाची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली होती. मात्र योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर आग्रीपाडा पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांवरून पुन्हा एकदा विचारस्वातंत्र्य विरुद्ध धार्मिक भावना या प्रश्नावर चर्चा रंगली आहे.