निसी मित्रा (22) असे तरुणीचे नाव असून ती अंधेरी पूर्वेतील लोकदर्शन कॉम्प्लेक्समध्ये कुटुंबासह राहते. ख्रिसमस सुट्टीमुळे 29 डिसेंबर रोजी दुपारी निसी घरी एकटीच होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी सव्वाचारच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने तिच्या घराची बेल वाजवत “508 नंबरसाठी पार्सल आहे,” असे सांगितले. मात्र आपण कोणतेही पार्सल मागविले नसल्याचे निसीने स्पष्ट केले. त्यानंतर तो तरुण निघून गेला.
advertisement
काही वेळाने तोच तरुण पुन्हा परत आला आणि पार्सल तुमचेच असल्याचा आग्रह धरू लागला. त्याने फोनवरून कोणाशी तरी बोलण्यास निसीला सांगितले; मात्र तिने त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगत पार्सल सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितले. याच क्षणी आरोपीने अचानक घरात प्रवेश करत चाकू दाखवून पैशांची मागणी केली.
रात्री अकराची वेळ, पिशवीत काहीतरी घेऊन फिरत होता पुण्यातील तरुण; उघडताच पोलिसांकडून अटक
निसीच्या काकूंनी बेल वाजवली...
भीतीपोटी निसीने खिशातील दोन हजार रुपये त्याला दिले. तरीही आरोपीने अधिक पैशांची मागणी करत तिचा गळा व तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट झाली. दरम्यान निसीच्या काकूंनी घराची बेल वाजवली याचा राग आल्याने आरोपीने निसीला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेऊन मारहाण केली. या झटापटीत निसी बेशुद्ध पडली.
सायंकाळी सुमारे पाच वाजता पुन्हा बेल वाजल्याने निसीला शुद्ध आली. तोपर्यंत आरोपी घरातून पळून गेला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने निसीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. घरातील कपाटातील कपडे अस्ताव्यस्त झाल्याचेही आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. जखमी निसीला उपचारासाठी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.






