मुंबई: फेब्रुवारी महिन्यातच मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे मुंबईकर उकाडा आणि उन्हाच्या चटक्यांनी हैराण आहेत. अशातच पुढील काही दिवसांसाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
तापमान सामान्यपेक्षा 7 अंशांनी जास्त
advertisement
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तापमान सामान्यपेक्षा 6 ते 7 अंशांनी अधिक आहे. फेब्रुवारी महिन्यातच मुंबईचे तापमान 38.5 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, 26 फेब्रुवारी रोजी तापमान आणखी 1-2 अंशांनी वाढण्याचा अंदाज असून, त्यानंतर 27 आणि 28 फेब्रुवारीला किंचित घट होईल. मात्र, ही घट फारसा दिलासा देणारी नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कोकण किनारपट्टीत उष्णतेची लाट
कोकण किनारपट्टीवर देखील उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे या भागात देखील उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण जालीये. उत्तर भारतात हवामानात बदल जाणवत आहेत. त्याचे परिणाम मुंबईसह कोकणात देखील जाणवत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीला देखील उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होतेय.
मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट
वाढत्या तापमानामुळे मुंबईच्या जलसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उष्णतेमुळे जलसाठ्यातील पाणी झपाट्याने आटण्याची भीती आहे. मुंबईच्या सात तलावांमध्ये सध्या केवळ 51.12 टक्के पाणी शिल्लक आहे. जर उच्च तापमान असेच राहिले, तर पाणीसाठा अपेक्षेपेक्षा वेगाने कमी होऊ शकतो. महापालिका अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या शहरात तापमान अत्यंत जास्त असून, त्यामुळे जलसाठ्यांवर परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षीही असाच अनुभव आला होता आणि मे महिन्यात आम्हाला पाणीकपात करावी लागली होती.”
नागरिकांनी घ्यावी काळजी
सध्याच्या स्थितीत मुंबई महापालिका आणि हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे, शक्यतो दुपारी बाहेर जाणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे