रविवारी दक्षिण आणि मध्य मुंबईत अनेक प्रमुख मार्ग बंद असणार आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी धावणे, एलिट रेस, चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन, ज्येष्ठ नागरिक धावणे आणि ड्रीम रन अशा स्पर्धांचा समावेश असणार आहे. या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मॅरेथॉन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान, मरीन ड्राइव्ह, वरळी, दादर, माहीम, वांद्रे आणि लगतच्या रस्त्यांसारख्या महत्त्वाच्या भागातून जाईल.
advertisement
प्रवाशांच्या आणि धावपटूंच्या दृष्टीने मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी, 18 जानेवारी 2026 रोजी पहाटे 03:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता, अनेक प्रमुख रस्ते नियमित वाहतुकीसाठी बंद राहतील. वाहतूक अधिसूचनेनुसार, मॅरेथॉनच्या वेळेत दक्षिण मुंबई, वरळी, माहीम आणि वांद्रे मध्ये वाहनांना बंदी केले गेले आहे. बहुतेक शर्यती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) किंवा जवळच्या ठिकाणांपासून सुरू होतील आणि मरीन ड्राइव्ह, वरळी सी फेस, कोस्टल रोड आणि वांद्रे- वरळी सी लिंक भागातून जातील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मॅरेथॉनची वेळ
- पूर्ण मॅरेथॉन (42.195 किमी ): पहाटे 05:00 ते दुपारी 12:30
- हाफ मॅरेथॉन (21.097 किमी): सकाळी 05:00 ते 09:10
- 10 किमी वेळेनुसार धावणे: सकाळी 06:00 ते 08:00 वाजेपर्यंत
- एलिट मॅरेथॉन शर्यत: सकाळी 07:00 ते 10:30
- अपंगत्वासह चॅम्पियन रन: सकाळी 07:05 ते 07:45
- ज्येष्ठ नागरिक धाव: सकाळी 07:25 ते 08:45
- ड्रीम रन: सकाळी 08:15 ते 11:00
'या' ठिकाणी पार्किंगवर मनाई
मॅरेथॉनच्या दिवशी पहाटे 04:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत एमजी रोड, डीएन रोड, मरीन ड्राईव्ह, वीर नरिमन रोड, पेडर रोड, वरळी सी फेस रोड, डॉ. अॅनी बेझंट रोड, खान अब्दुल गफ्फार खान रोड, वांद्रे- वरळी सी लिंक यांसारख्या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यासाठी मनाई आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून मुंबईकरांना मॅरेथॉनच्या दिवशी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक पोलिसांच्या सूचना आणि फलकांचे पालन करण्याचे आवाहन केले.
