बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 31 मे 2026 पर्यंत ह्या फ्लायओव्हरच्या कामाची डेडलाइन निश्चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे हा ब्रिज तयार होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या ब्रिजचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बांधकाम स्थळाला भेट दिली. पाहणी दरम्यान, त्यांनी अधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
advertisement
योजनेनुसार, उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील सर्व कामे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. ब्रिजचे काम पूर्ण झाल्यानंतरच 25 जून 2026 पर्यंत संपूर्ण ब्रिज प्रवाशांसाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पुढे निवेदनात असे म्हटले की, विद्याविहार उड्डाणपूल हा दोन पदरी आहे, ज्याची एकूण लांबी सुमारे 650 मीटर आहे. रेल्वेच्या क्षेत्रामध्ये एकूण ब्रिज 100 मीटर इतका आहे, पूर्वेकडील बाजूला 220 मीटरचा मार्ग तर पश्चिमेकडील बाजूस 330 मीटरच्या मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पात उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्गही दिला जात आहे.
त्यासोबतच दोन्ही बाजूंचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांचीही पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गंत केली आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्गही समाविष्ट आहे. बांगर म्हणाले की, पूर्वेकडील काम अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण पुलाचे डांबरीकरण आणि रस्त्याचे काम फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस पूर्ण होईल. त्यांनी अधिकार्यांना अंतिम मुदती पूर्ण करण्यासाठी तपशीलवार, टप्प्या टप्प्याने कामाचे वेळापत्रक तयार करण्यास सांगितले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पश्चिमेकडील सहा खांबांचे काम आधीच पूर्ण झाले आहे. उर्वरित चार खांब, पुलाचे स्पॅन आणि पुलाच्या जवळच्या रस्त्याचे बांधकाम करणे अद्याप प्रलंबित आहे.
या टप्प्यात वाहतूक वळवणे हे एक मोठे आव्हान आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे काम प्रथम पूर्ण केले जाईल, जेणेकरून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध होईल, असे निवेदनात म्हटले आहे. पावसाळा लक्षात घेऊन, बांगर यांनी सर्व प्रमुख संरचनात्मक कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पृष्ठभागाचे काम पूर्ण करावे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उड्डाणपूल 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करून कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीसाठी खुला करावा, असे म्हटले आहे.
