मुंबईकरांसाठी पाणी संकट
मुंबई महानगरपालिकेने मेट्रो ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचे महत्त्वाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी 2400 मिमी व्यासाच्या मोठ्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असून हे काम 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन 26 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. एकूण सुमारे 99 तास हे काम सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
advertisement
या कालावधीत धारावी (जी उत्तर), अंधेरी पूर्व (के पूर्व) आणि वांद्रे पूर्व (एच पूर्व) विभाग कार्यालयांच्या हद्दीतील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. काही परिसरांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक त्या पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाणीपुरवठ्याच्या वेळा बदलल्या?
जी उत्तर विभागातील धारावी परिसरात सकाळी तसेच सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, जस्मिन मील मार्ग, संत रोहिदास मार्ग, 60 फूट आणि 90 फूट मार्ग अशा भागांमध्ये ठरावीक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
के पूर्व विभागातील कबीर नगर, बामणवाडा, विमानतळ परिसर, पारसीवाडा, कोलडोंगरी, मोगरापाडा, विजय नगर या भागांमध्ये दुपारच्या आणि सायंकाळच्या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
एच पूर्व विभागातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), प्रभात वसाहत, कलिना, खेरवाडी, शासकीय वसाहत, गोळीबार मार्ग, खार सब-वे परिसरातही ठरावीक वेळेत पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
