रेश्मा या विवाहानंतर त्या कुठेही नोकरी करत नव्हत्या. पती हे रिक्षा चालक होते आणि परिसरात त्यांची ओळख ‘रिक्षावाले’ म्हणूनच होती. त्यांची स्वतःची एक छानशी रिक्षा होती. मात्र, 2015 साली दुर्दैवाने रेश्मा यांच्या पतीचे अकाली निधन झाले. संसाराचा कणा हरपला आणि एका लहान मुलासह रेश्मा यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले.
advertisement
सावित्रीची लेक! पुण्यातील बुधवार पेठेतला ‘तो’ निर्णय, अनेक महिलांचं आयुष्यच बदललं, Video
रेश्मा यांनी निर्णय घेतला
पतीच्या निधनानंतर रिक्षा तशीच बंद पडून होती. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. मात्र अशा कठीण काळात न घाबरता, न थांबता रेश्मा यांनी एक धाडसी निर्णय घेतला. पतीचीच रिक्षा पुन्हा सुरू करून ती चालवण्याचा त्यांचा निर्णय होता. पण सुरुवातीला ही वाट सोपी नव्हती. त्या काळातील रिक्षा किक मारून सुरू कराव्या लागत. सवय नसल्याने अनेकदा रिक्षा सुरू होत नसे. अशावेळी रिक्षा चालक बांधव मदतीला धावून येत. हळूहळू त्यांनी रिक्षा चालवणे शिकले, रस्त्यावरील अनुभव घेतला आणि आत्मविश्वास मिळवला.
आपली जुनी रिक्षा दुरुस्त करण्यासाठी त्यांनी थोडे कर्ज घेतले आणि ती व्यवस्थित केली. पुढे दिव्याज् फाउंडेशनकडून दीड लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाल्यानंतर त्यांनी कर्ज फेडले. रिक्षा नव्याने तयार केली आणि स्टार्ट बटन असलेली रिक्षा वापरण्यास सुरुवात केली.
पहाटेच सुरू होतो दिवस
रेश्मा दळवी यांचा दिवस पहाटे सकाळी सहा वाजता सुरू होतो. त्या आधी अंगणवाडीतील लहान मुलांसाठी खाऊ बनवण्याचे काम करतात. तसंच मध्यंतरी त्या स्टॉल सुद्धा लावायच्या. यानंतर दिवसभर आणि अनेकदा रात्रीपर्यंत त्या रिक्षा चालवतात. कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी आपल्या लेकाला सांभाळले.
आज रेश्मा यांचा मुलगा बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटीआयमध्ये कार्यरत आहे. या प्रवासात त्यांच्या भावंडांनी, मित्र-मैत्रिणींनी आणि रिक्षा चालक बांधवांनी त्यांना मोठा आधार दिला, याबद्दल त्या आजही कृतज्ञतेने बोलतात.
अनेकांसाठी प्रेरणा
मुंबईसारख्या महानगरात आज रिक्षा चालक क्षेत्रात महिलांचे प्रमाण सुमारे 5 ते 10 टक्के असले तरी रेश्मा दळवी यांच्यासारख्या महिला अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. प्रवासी रिक्षात बसताना अभिमानाने म्हणतात, “अरे वा, एक स्त्री रिक्षा चालवते!”—हे शब्दच त्यांच्या कष्टाचे चीज करणारे आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाच्या शिदोरीमुळे आणि स्त्रीशक्तीच्या बळावर आज समाजात अनेक महिला विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण करत आहेत. दहिसरच्या रेश्मा दळवी यांची कहाणी ही त्याच परिवर्तनाचे ठळक उदाहरण आहे. पतीच्या निधनानंतरही न डगमगता, न घाबरता स्वतःच्या कष्टांवर उभी राहिलेली एक खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान महिला होय.





