समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील एका परिसरात राहणाऱ्या महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना सांगितले की, तिच्या नावावर असलेली चारचाकी कार तिचा नवरा कोणतीही पूर्वसूचना न देता घरासमोरून घेऊन गेली आहे. अनेक वेळा संपर्क साधूनही पतीने कार परत दिली नसल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. महिलेचे आणि पतीसोबत वाद असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
नेमकं काय म्हटलं आहे तक्रारीत?
तक्रारीत महिलेने स्पष्ट केले आहे की, संबंधित कार तिच्या वैयक्तिक वापरासाठी असून त्याचे सर्व कागदपत्रे तिच्या नावावर आहेत. मात्र पतीने जबरदस्तीने ती कार न सांगता घेतली आहे. यामुळेच तक्रारीत पत्नीने पतीवर चोरीचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला असला तरी, अद्याप आरोपी पतीविरोधात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
सध्या कारचा शोध सुरू
या प्रकरणामुळे पती-पत्नीमधील वैवाहिक नातेसंबंध आणि मालमत्तेच्या हक्कासंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सध्या कारचा शोध घेण्याचे काम सुरू असून, संबंधित पतीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
प्रकरणाची चर्चा शहरभर रंगली
दरम्यान, या घटनेची शहरभर चर्चा रंगली असून, वैयक्तिक वाद कधी गुन्हेगारी स्वरूप धारण करतात याचे हे एक दुर्दैवी उदाहरण असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासनाकडून लवकरच या प्रकरणात स्पष्टता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
