नालासोपारा पश्चिम येथील नाळे परिसरातील बेणापट्टी गावात एका प्रेमीयुगालाने आयुष्याचा शेवट केला आहे. बुधवारी सकाळी ही घडली. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नालासोपारा पोलीस अधिक तपास करत आहेत.
advertisement
तरुणीच्या घराजवळ आढळले मृतावस्थेत
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येची घटना बुधवारी (दिनांक १५ ऑक्टोबर) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अर्नाळा येथील सहजीवन पाडा परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाचे नाळा बेणापट्टी येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. बुधवारी सकाळी दोघंही तरुणीच्या घराजवळ मृतावस्थेत आढळले. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी विषारी पदार्थ प्राशन करून जीवन संपवले असावे, अशी प्राथमिक शक्यता नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी व्यक्त केली.
आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 'दोघांनी कोणत्या कारणास्तव टोकाचे पाऊल उचलले, याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे', अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तरुणांच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा पोलीस कसून तपास करत आहेत.