एका 'क्लिक'वर आयुष्यभराची कमाई स्वाहा
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय कर्ज सल्लागाराला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 72.70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
पीडित व्यक्तीला काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधत क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा नफा मिळेल असे सांगितले. सुरुवातीला आरोपींनी विश्वास संपादन करत थोड्या रकमेवर परतावा देत पीडिताचा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर हळूहळू अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
advertisement
मे 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत विविध ऑनलाइन वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीडिताकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेण्यात आली. गुंतवणूक वाढत असताना नफ्याचे आकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दाखवले जात होते, त्यामुळे पीडिताला कोणतीही शंका आली नाही.
स्कॅम उघडकीस येताच पीडिताने पोलिसांकडे धाव घेतली
मात्र काही काळानंतर अचानक संबंधित वेबसाइट्सवरून पीडिताचा अकाउंट ब्लॉक करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी फोन, ई-मेल आणि मेसेजद्वारे संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्ती आणि तीन वेब प्लॅटफॉर्मविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
