नफा मिळतोय असं वाटलं, पण फसवणूकच झाली
गेल्या महिन्यात संबंधित महिलेला इंस्टाग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगबाबत जाहिरात दिसली. अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांना थेट एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपमध्ये दररोज इतर सदस्यांकडून भरघोस नफा, डबल रिटर्न,सुरक्षित गुंतवणूक असे मेसेज पोस्ट होत होते.
जवळपास एक महिना त्या ग्रुपमधील हालचाली निरीक्षण करत होत्या. सतत इतर सदस्यांना नफा मिळत असल्याचे स्क्रीनशॉट्स आणि मेसेज पाहून महिलेला देखील गुंतवणूक करण्याचा मोह आवरता आला नाही. सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून विश्वास निर्माण करण्यात आला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमेची मागणी केली.
advertisement
महिलेला अधिक नफ्याचे आमिष दाखवत एकूण 16 लाख 79 हजार रुपये गुंतवायला भाग पाडण्यात आले. मात्र, काही दिवसांनंतर ना नफा मिळाला ना मूळ रक्कम परत आली. संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप आणि नंबर बंद झाल्याचे लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. नेरुळ पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीचा गंभीर धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
