उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. बैठकीला कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि आशिष शेलार हेही उपस्थित होते. या चित्रनगरीत आधुनिक शूटिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा – मोठ्या इनडोअर स्टुडिओ, आउटडोअर सेट तसेच तांत्रिक उत्पादन केंद्रे उपलब्ध करून देण्यात येतील. चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही शो आणि जाहिरातींच्या शूटिंगसाठी हे ठिकाण अत्यंत आकर्षक ठरेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
इगतपुरी हा डोंगराळ आणि निसर्गरम्य परिसर असल्याने येथे शूटिंगसाठी नैसर्गिक पार्श्वभूमी सहज उपलब्ध आहे. यामुळे मोठ्या चित्रपट निर्मात्यांना आणि प्रॉडक्शन हाउसेसना मुंबईबाहेरही उत्कृष्ट शूटिंग लोकेशन्स मिळतील तसेच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. हॉटेल व्यवसाय, परिवहन, पर्यटन आणि स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की नाशिक हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी चित्रनगरी उभारणे हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागात चित्रपटसृष्टीचा विकास होऊन राज्यातील आर्थिक, पर्यटन आणि प्रादेशिक प्रगतीला नवे बळ मिळेल.
नाशिक जिल्ह्याला महामार्ग, रेल्वे आणि विमान वाहतुकीच्या सोयीसह उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांमुळे येथील व्यवस्थापन आणि सुविधा आधीच विकसित आहेत.या सर्व कारणांमुळे चित्रनगरीसाठी हा परिसर अत्यंत योग्य मानला जातो.
या प्रकल्पाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी सरकारने तज्ज्ञ सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. संबंधित संस्थेचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर त्यावर आधारित अद्ययावत प्रस्ताव तयार करून कामाला गती देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ चित्रपट उद्योगालाच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील विकासाला नवे वळण मिळण्याची अपेक्षा आहे.