अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कांड
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी मानखुर्द परिसरातील रहिवासी आहे. तिला नशामुक्तीसाठी मालवणी येथील एका केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र ज्या ठिकाणी तिची काळजी घेणे अपेक्षित होते त्याच ठिकाणी केंद्राच्या संचालकाने जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर संचालकाने पीडितेच्या मैत्रिणीलाही आपल्या वासनेचा शिकार बनवले.
advertisement
पीडितेला जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा प्रकार
या अत्याचारातून पीडित मुलगी गरोदर राहिली. ही बाब केंद्राच्या महिला संचालिकेच्या लक्षात आली तेव्हा तिने पोलिसांना कळवण्याऐवजी किंवा मदत करण्याऐवजी पीडितेला विविध औषधे देऊन तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात घडवून आणला. या भीषण कृत्यात केंद्रातील इतर दोन कर्मचाऱ्यांनीही साथ दिली. त्यांनी पीडितेशी अश्लील चाळे केले आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जबरदस्तीने आंघोळ करण्यास भाग पाडले.
पीडित मुलगी या सततच्या शारीरिक आणि मानसिक शोषणाला कंटाळली होती. अखेर तिने मालवणी पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोक्सो कायद्यांतर्गत आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
