बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात ‘मुंबई क्लीन लीग’ नोंदणी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. महापौर अनुपस्थित असल्याने उपमहापौर संजय घाडी हे प्रोटोकॉलनुसार प्रमुख असणे अपेक्षित होते. मात्र, उपमहापौरांना चौथ्या क्रमांकाची आसनव्यवस्था देण्यात आल्याचा आरोप शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी केला आहे. एवढंच नाहीतर या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवत आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. ही घटना प्रोटोकॉल आणि संस्थात्मक सन्मानाला बाधा पोहोचवणारी असल्याचं पत्रात नमूद केलं असून उपमहापौरांची जाहीर माफी मागावी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, पुढील कार्यक्रमांत प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी घोले यांनी केली आहे.
advertisement
दरम्यान, महायुतीत मानापमान नाट्यामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदेंच्या गटनेत्यांचे आयुक्तांकडे पत्र चर्चेत आलं आहे.
अमेय अरुण घोलेंनी पत्रात काय लिहिलंय?
मा. आयुक्त,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
मुंबई.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या 'मुंबई क्लीन लीग स्पर्धेच्या नोंदणी कार्यक्रमासंदर्भात, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे आज पार पडलेल्या कार्यक्रमाबाबत आपणास हे पत्र सादर करीत आहे. सदर कार्यक्रमास पद्मश्री अभिनेता अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत नोंदणीची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मात्र, या कार्यक्रमादरम्यान प्रोटोकॉलमधील त्रुटी आढळून आल्या आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. महापौर उपस्थित नसताना, नियमांनुसार उपमहापौर हेच प्रमुख (पहिल्या क्रमांकाचे) असतात. तरीही, उपमहापौर श्री. संजय घाडी यांना चौथ्या क्रमांकाची आसन व्यवस्था देण्यात आली, जे पूर्णतः अयोग्य व शिष्टाचाराला धरून नसलेले आहे. ही बाब केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून, महानगरपालिकेच्या प्रोटोकॉल आणि संस्थात्मक सन्मानाला बाधा पोहोचवणारी आहे.
त्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की:
1. सदर प्रकाराबद्दल प्रशासनामार्फत उपमहापौरांची जाहीर माफी मागण्यात यावी.
2. या प्रकरणास जबाबदार अधिकाऱ्यांची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.
3. यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ आवश्यक ती कार्यवाही कराल, ही अपेक्षा.
धन्यवाद.
