राहत्या घरी निधन
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अध्यक्षा आणि महान धावपटू पीटी उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे शुक्रवारी केरळमधील राहत्या घरी निधन झालं. श्रीनिवासन यांच्या जाण्याने पीटी उषा यांच्या आयुष्यातील एक भक्कम आधारवड कोसळला आहे. या वृत्तामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली असून, अनेक दिग्गज खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
advertisement
कबड्डी खेळाडू म्हणून ओळख
व्ही. श्रीनिवासन हे स्वतः देखील एक उत्तम खेळाडू होते. आपल्या तरुणपणात त्यांनी कबड्डी खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) एक अधिकारी म्हणून देशसेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ पीटी उषा यांच्या कारकिर्दीला आणि त्यांच्या 'उषा स्कूल ऑफ ॲथलेटिक्स'च्या व्यवस्थापनाला समर्पित केला होता.
पय्योली एक्सप्रेस
पीटी उषा यांच्या यशामागे श्रीनिवासन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे नेहमीच मानले जाते. ट्रॅकवरच्या कामगिरीपासून ते प्रशासकीय जबाबदाऱ्यांपर्यंत, श्रीनिवासन यांनी प्रत्येक पावलावर उषा यांना साथ दिली. जेव्हा पीटी उषा यांनी 'पय्योली एक्सप्रेस' (Payyoli Express) म्हणून जगभरात नाव कमावलं, तेव्हा श्रीनिवासन यांनी पडद्यामागे राहून त्यांच्या सरावाकडे आणि आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिलं होतं.
हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
दरम्यान, श्रीनिवासन यांचं निधन हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनानंतर केरळचे मुख्यमंत्री आणि देशातील अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पीटी उषा यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर देखील क्रीडा चाहत्यांनी 'गोल्डन गर्ल'च्या पतीला श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.
