सध्या वसई-विरार शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाकडून 114 बसेस 36 मार्गांवर धावत आहेत. ज्यामध्ये तब्बल 40 ई-बसेसचाही समावेश आहे. शहरात रोज सुमारे 2200 फेऱ्या घेतल्या जातात आणि त्यात जवळपास 70 हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोगग्रस्त रुग्ण यांना मोफत सेवा मिळते आणि आतापर्यंत 19 हजारांहून अधिक प्रवाशांची नोंदणी झाली आहे. याशिवाय महिलांसाठी बस प्रवासात 50 टक्के सवलतही लागू करण्यात आली असून त्यामुळे दररोज सुमारे 25 ते 30 हजार महिला प्रवास करतात.
advertisement
स्मार्ट कार्डचा नेमका फायदा कोणता?
या सर्व सवलतींचे नियोजन आणि पारदर्शकता राखण्यासाठी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्मार्ट कार्ड प्रणालीचा निर्णय घेतला आहे. यामुळे किती प्रवासी बसने प्रवास करतात, कितीजणांना सवलत मिळते, महिलांच्या प्रवासाचे प्रमाण किती आहे या सर्व गोष्टींची अचूक नोंद ऑनलाइन मिळणार आहे. स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी वेळ वाचेल आणि व्यवहार अधिक सोपा होईल.
पैशांचा होणारा घोटाळा थांबणार?
पालिका सध्या ठेकेदारामार्फत बससेवा चालवते. ठेकेदाराला सवलतीच्या प्रवासाची रक्कम महापालिकेकडून दिली जाते. मात्र, आतापर्यंत यात पारदर्शकतेचा अभाव होता. आता स्मार्ट कार्ड वापरल्याने ठेकेदाराला फक्त प्रत्यक्ष प्रवासाच्या प्रमाणावरच पैसे दिले जातील. त्यामुळे दोन्ही बाजूंचं काम अधिक नीट आणि पारदर्शकपणे होईल.
यासोबतच शहरातील बसथांब्यांची अवस्थाही सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी बसथांबे मोडकळीस आले आहेत याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून बसथांबे सुसज्ज स्वरूपात तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिल्या आहेत.
पालिका आयुक्त सूर्यवंशी म्हणाले,सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. यातून प्रवाशांचा आणि ठेकेदाराचा डेटा ऑनलाइन स्वरूपात मिळेल. जितका प्रवास होईल, त्या प्रमाणात ठेकेदाराला पैसे दिले जातील, त्यामुळे कामकाज अधिक पारदर्शक होईल. एकूणच पाहता स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे वसई-विरार परिवहन सेवा अधिक आधुनिक, सोयीस्कर आणि पारदर्शक बनणार आहे.
