नालासोपारा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्याने मोठा त्रास होत होता. याच पार्श्वभूमीवर 2023 मध्ये पोलिस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन शौचालय बांधकामासाठी मागणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या बांधकामासाठी 5,45,835 रुपयांचा टेंडर मंजूर केला. हा टेंडर जोजल लोपिस या ठेकेदाराला देण्यात आला. विभागाकडून यासाठी शौचालय आणि सेप्टिक टँक तयार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
advertisement
प्रत्यक्षात काय घडलं?
काम सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने कोणतेही नवीन शौचालय बांधले नाही. त्याऐवजी, पोलिस ठाण्यात आधीपासून अस्तित्वात असलेले जुने शौचालय केवळ रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्ती करून ‘काम पूर्ण झाले’ असा दाखला दिला.
यानंतर ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 6,42,536 रुपयांचे (GST सहित) बिल सादर केले. विभागातील अधिकाऱ्यांनीही कोणतीही पडताळणी न करता हे बिल मंजूर करून ठेकेदारास पूर्ण रक्कम अदा केली.
आरटीआयमधून उघड झाला घोटाळा
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाबाबत माहिती अधिकार कायद्यानुसार (RTI) माहिती मागवली. त्यातून उघड झाले की, नवे शौचालय किंवा सेप्टिक टँक बांधण्यात आलेच नव्हते. केवळ जुनी सुविधा रंगवून आणि डागडुजी करून लाखो रुपयांचे बिल पास करण्यात आले होते.
या आरटीआयनंतर पोलिसांनी स्वतःच या प्रकरणाची तपासणी सुरू केली. चौकशीत ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी यांनी संगनमत करून पोलिस विभागाशी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
नालासोपारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमरसिंह पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नालासोपारा पोलिसांनी ठेकेदार जोजल लोपिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.