मुंबईतील वरळी डोम येथे भाजपच्या राज्य अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यपदी घोषणा करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होताच, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली.
आता भाजप आगे बढो म्हणायचं - रवींद्र चव्हाण
advertisement
'माझी सर्वांना विनंती आहे, कधीच रवीदादा आगे बढो किंवा कधीच रवी चव्हाण आगे बढो असं नाही, फक्त भाजपा आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. माझी आज या पदावर निवड झाली आहे, खरंतर भारतीय जनता पार्टीने मला हे पद देऊन माझ्यावर उपकार केले. कारण माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांमुळे मला चांगले काम करता आले. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो आणि काय झालो. त्यावेळचा काळ आणि आज, एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रमुख पदावर मला संधी दिली. मी २००२ साली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. तिथून काम करत, एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता भाजपचा अध्यक्ष होतो हे कुठल्याच पक्षात होणार नाही. त्यामुळे हे माझ्यावर उपकार आहेत, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांचं अतिशय चांगलं काम - बावनकुळे
तर, 'देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अतिशय चांगलं काम रवींद्र चव्हाण यांनी केलंय. राज्यात जी काही कामे सुरू आहेत ती काम सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी केले. पक्षाचा 11 वा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली तेव्हा मी घाबरलो होतो. मला नड्डा यांनी फोन केला म्हणाले तुम्हाला अध्यक्ष व्हायचं आहे.भाजपचे अध्यक्ष पद खूप मोठे आहे. अत्यंत महत्वाचं पद हे आहे. मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा मी यादी पाहिली या पदावर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी काम केले. माझ्यावर त्यावेळी विश्वास ठेवला म्हणून मी यशस्वी प्रदेशाध्यक्ष झालो. देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली मला आपण एवढी मोठी जबाबदारी दिली. जेव्हा जेव्हा मी चुकलो तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मला मार्गदर्शन केलं. आपला पक्ष घराघरात पोहोचवण्यासाठी मला कार्यकर्त्यांनी मदत केली, अशी भावना यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केली.