तक्रार दाराच्या तक्रारीनंतर दहिसर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपीला मिरा भाईंदर येथून अटक करण्यात आली आहे. दहिसरच्या सायबर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून दहिसर पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर या कारवाईबद्दलची माहिती दिली आहे.
बोरिवलीमध्येही असाच प्रकार
दरम्यान मुंबईच्या बोरिवलीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. महिलेचं स्नॅपचॅट अकाऊंट हॅक करून तिचे फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड केले गेले, यानंतर तिचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केलं गेलं. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपी पवनकुमार धर्मारेड्डी (वय 28) याला कर्नाटकच्या बेल्लारीमधून अटक केली. आरोपीने याआधीही याच महिलेची बदनामी केल्याचंही तपासात समोर आलं आहे.
एकतर्फी प्रेमातून बदनामी
आरोपीने 25 सप्टेंबरला बोरिवलीच्या महिलेच्या घरी तिची परवानगी नसताना सोशल मीडियावर अश्लिल व्हिडिओ अपलोड केला. महिलेने आरोपीला वारंवार असं न करण्याची विनंती केली, पण तरीही त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून तिचा छळ केला. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेने तक्रार केल्याचं समजल्यानंतर आरोपी कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात मामाच्या घरी लपला होता, याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपीला बेल्लारी येथे जाऊन अटक केली.
आरोपीचं महिलेवर एकतर्फी प्रेम असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपीने महिलेला प्रपोज केलं, पण तिने नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचा छळ करायला सुरूवात केली.