रविवारी मेट्रोचे वेळापत्रक बदलले
मुंबईत 2026 ची टाटा मुंबई मॅरेथॉन येत्या रविवारी 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू सहभागी होणार असून त्यांना वेळेत सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचता यावे यासाठी मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वा लाईनकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मॅरेथॉनच्या दिवशी पहाटेपासूनच मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.
advertisement
कसे असेल मेट्रोच वेळापत्रक
धावपटू आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ॲक्वा लाईनवर अतिरिक्त आणि लवकर सुरू होणाऱ्या मेट्रो गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली मेट्रो सकाळी 3:30 वाजता आरे जेव्हीएलआर आणि कफ परेड या दोन्ही टर्मिनल्सवरून सुटणार आहे. त्यानंतर सकाळी 4:30 वाजता आरे जेव्हीएलआर येथून दुसरी मेट्रो धावणार आहे. तसेच सकाळी 4:50 वाजता कफ परेड येथून दुसरी मेट्रो सेवा उपलब्ध असेल.
मुंबई मेट्रो 3 च्या अधिकृत 'एक्स'हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे की, मॅरेथॉनसाठी लवकर प्रवास करणाऱ्या धावपटूंनी ॲक्वा लाईनचा वापर करावा. जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी 18 जानेवारी रोजी अतिरिक्त मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉनची सुरुवात पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून होणार असून तिचा शेवट हा एम.जी.रोडवरील मुंबई जिमखाना येथे होणार आहे.
