300 कोटींचा निधी
मुंबईतील पश्चिम उपनगरांना थेट ठाणे शहराशी जोडण्यासाठी ठाणे-बोरिवली हा दुहेरी बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आर्थिक मंजुरी दिली असून ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 300 कोटींचा निधी एमएमआरडीएला मिळाला आहे. यातील 210 कोटी रुपये हे दुहेरी बोगद्यासाठी असतील, तर उर्वरित मरीन ड्राइव्ह प्रकल्पसाठी 90 कोटी रुपये असतील. या मोठ्या निधीमुळे कामाला वेग येणार आहे.
advertisement
मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ मार्गावरचा केबल-स्टेड ब्रिज खुला होणार, डेडलाईन ठरली!
कसा असेल मार्ग?
सध्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाची निर्मिती केली जात आहे. हा भुयारी रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून त्याची एकूण लांबी 11.85 किलोमीटर असेल. यातील 10.25 किमीचे अंतर हे भुयारी बोगद्याद्वारे पार करण्यात येईल. भुयारी मार्गात दोन मुख्य मार्गिका असतील. परंतु, आपत्कालिन परिस्थितीसाठी एक स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येईल. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल आणि आपत्कालिन परिस्थितीत तातडीची मदत मिळेल. या प्रकल्पासाठी तब्बल 18 हजार 838 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून नागरी परिवहनसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दीड तासांचा प्रवास 12 मिनिटांत
दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली हे दीड ते दोन तासांचे अंतर सुमारे 12 मिनिटांत पार करता येईल. भुयारी मार्गात सिग्नल नसल्याने वाहनांना विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी दिला असून हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा प्रकल्प नागरी वाहतुकीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.
घोडबंदर रोडवरील गर्दी कमी
सध्या ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करणाऱ्यांना घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील या वाहतुकीचा ताण जाणवतो. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा सुरू झाल्यानंतर या दोन्ही महामार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच वाहन चालकांची इंधन बचत देखील होईल. विशेष म्हणजे या भुयारी मार्गामुळे परिसरातील विकासाला देखील चालना मिळेल.
दरम्यान, ठाणे आणि मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडून निधीची पहिली मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार असून ठाणे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.