आर्म ब्रिजमुळे पनवेलपर्यंतचा प्रवास होणार सहज
सध्या पाम बीच मार्गावरून शीव-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना थेट जोडणी नसल्याने दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो. अनेकांना वाशी प्लाझा किंवा तुर्भे येथील मॅफ्को मार्गाचा वापर करावा लागतो ज्यामुळे 15 ते 20 मिनिटांचा वेळ आणि मोठ्या प्रमाणात इंधनाचा अपव्यय होतो. नवीन आर्म ब्रिज तयार झाल्यानंतर हा त्रास पूर्णपणे कमी होणार असून वाशी, कोपरखैरणे, कोपरी आणि तुर्भे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
या प्रकल्पासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सुमारे 11 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. सुरुवातीला पुलाचा आराखडा कल्व्हर्ट पद्धतीचा ठेवण्यात आला होता मात्र हा भाग सागरी किनाऱ्याच्या संवेदनशील (CRZ) क्षेत्रात येत असल्याने सीआरझेड प्राधिकरणाने त्या आराखड्याला हरकत घेऊन बदल सुचवले. सुधारित आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर मनपाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आणि आता ते पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
कधी होणार पूल सुरु?
सध्या पुलाचे सर्व सिव्हिल काम जवळपास पूर्ण झाले असून अंतिम तपासणीसह सिग्नल प्रणाली, दिशादर्शक फलक आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांची उभारणी सुरू आहे. नियोजनानुसार सर्व कामे पूर्ण झाल्यास हा पूल जानेवारी 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
ब्रिजचे सिव्हिल काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. अंतिम तपासणीनंतर सिग्नल आणि दिशादर्शक फलक बसवले जातील. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर जानेवारीत हा मार्ग नागरिकांसाठी खुला करू,अशी माहिती वाशी विभागाच्या कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे यांनी दिली. या पुलाच्या उद्घाटनानंतर पाम बीच मार्ग आणि शीव-पनवेल महामार्ग यांच्यातील प्रवास अधिक सुकर, वेळेची बचत करणारा आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे.
